प्रति,
आदरणीय श्रीमती उज्वलाताई पवार,
सचिव विश्वस्त – सरस्वतीदेवी विद्या विकास ट्रस्ट,
सविनय नमस्कार.
पत्र लिहिण्यास विलंब झाल्याबद्दल सर्वात प्रथम क्षमा मागतो .
२६ जुलै २०२५ रोजी सरस्वतीदेवी विद्या विकास ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला आणि पहिलं पाऊल संस्थेला मिळाली, हा माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी अनुभव ठरला.
संपूर्ण सभागृहात उपस्थित असलेल्या तुमच्यासारख्या दानशूर, संवेदनशील आणि मोठ्या मनाच्या मान्यवरांमुळे एक सकारात्मक उर्जा जाणवत होती. लाभार्थी आणि दानदात्यांमध्ये तुम्ही आणि ट्रस्टच्या सर्व मान्यवर सदस्यांनी केलेले वैयक्तिक संवाद आणि आत्मीय वागणूक मनाला अतिशय स्पर्शून गेली.
कार्यक्रमानंतर माझ्या टीमला मी हा अनुभव सांगितल्यावर ते देखील खूप प्रेरित झाले आणि ट्रस्ट करत असलेल्या कार्याला मनापासून सलाम केला.
विशेष आनंद वाटतो की, आम्हाला दिलेल्या निधीचा चेक आम्ही हार्डोल सोलर कंपनीकडे जमा केला असून, कंपनीने निधी प्राप्त झाल्याची खात्री दिली आहे. त्याअंतर्गत ६०W चे ९ आणि ३०W चे १ असे एकूण १० सोलर फ्लड लाइट्स मिळणार असून, यामुळे आमच्या ४ शाळांमध्ये प्रकाशाची सोय होणार आहे. येत्या आठवड्यात उपकरणांची डिलिव्हरी होणार असून, प्रकल्पाचे उद्घाटन लवकरच आयोजित केले जाईल. (हार्डोल सोलर कंपनीने या सामाजिक उपक्रमासाठी विशेष सवलत दिली आहे ).
आपण आणि ट्रस्टचे सर्व सदस्य या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहावं, ही आमची नम्र विनंती आहे. कार्यक्रमाचा दिनांक आणि वेळ आपल्याला सोयीचा असेल त्याप्रमाणे आम्ही निश्चित करू.
विशेष उल्लेख करतो की, ट्रस्टचे श्री.सुरेंद्र खेडेकर सर यांनी आम्हाला या ट्रस्टपर्यंत पोहोचवण्यास मदत केली, त्यांचे देखील मनःपूर्वक आभार.
उज्वलाताई, माझी वैयक्तिक विनंती आहे की, सरस्वतीदेवी विद्या विकास ट्रस्टसोबत भविष्यात कुठेही, कधीही, माझं काम उपयोगी ठरेल अशा ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळावी.
आपल्या सदैव आशीर्वादात राहू दे, हीच विनंती.
आपला नम्र,
संदेश सारंग
पहिलं पाऊल संस्था
नाशिक.
